जळगाव : महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलामधील गाळेधारकांकडे १६५ कोटी रुपयांची थकबाकी असून मालमत्ता धारकांकडे ८० कोटी रुपयां थकबाकी आहे. तसेच खुला भूखंड धारकांकडे ३८ कोटी व घरकुल धारकांकडे १६ कोटी असे एकुण २९९ कोटी रुपयांची थकबाकी महानगरपालिकेची थकीत आहे.
शहरातील सर्व रस्त्यांच्या कामासाठी ३५० ते ४०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. परंतु शासनाकडून एव्हढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळणे सध्या तरी शक्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने स्व निधीतून काही कामे करणे अपेक्षित आहे. तसेच मनपा कर्मचाऱ्यांचे सातवे वेतन लागू करण्यासाठी देखील मनपाचे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे, असे असतांना एवढ्या मोठयाप्रमाणात थकबाकी महापालिकेची मालमत्ताधार, गाळेधारक, खुला भूखंडधारक व घरकुलधारकांकडे असल्यामुळे महापालिकेने वसुली मोठी तीव्र करण्याची गरज आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून वसुलीसाठी धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.