चार दिवस उलटूनही मनपाच्या ‘त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही
महिलेची १० लाखात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल
जळगाव : महिलेची १० लाखात फसवणुक करणाऱ्या दोन मनपा कर्मचाऱ्यांवर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वरणगाव येथील महिलेस जळगाव शहरालगत असलेल्या मोहाडी येथे खोटा प्लॉट दाखवून व बनावट सौदापावती करुन महिलेची १० लाखात फसवणुक केल्याप्रकरणी तिघांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. यामध्ये संजू शिवराज परदेशी, आतिष रतनलाल राणा, अरविंद यशवंत बाऊस्कर या तिघांचा सामावेश असून त्यापैकी संजू शिवराज परदेशी व आतिष रतनलाल राणा हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. त्यामुळे सदर दोघांवर ४८ तासात महापालिकेकडून निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित होते मात्र, ४ दिवस उलटले तरीही महापालिकेकडून त्या दोघांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होत आहे.
गुन्हा दाखल होऊन ४ दिवस उलटले तरीही महापालिकेकडून फक्त कागदीघोडे नाचविण्याचे काम सुरु आहे. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यास ४८ तासात त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाते. परंतु असे असतांना महापालिकेकडून चार दिवस उलटल्यावर देखील संबधित कर्मचाऱ्यांचे निलंबन झालेले नाही, त्यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अतिष राणा याच्यावर यापुर्वीच बडतर्फीची कारवाई प्रस्तावित असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, आतिष राणावर यापुर्वी जिल्हापेठ पोलिस स्टेशन व एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता पुन्हा एमआयडीसीत महिलेची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला असतांना मनपा प्रशासन कारवाईसाठी पुढे सर्सावत नाही, यामागे काय कारण आहे, ते मात्र, समजू शकले नाही.
महापालिकेतील ९६ रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना कायमसेवेत समावून घ्यावे, यासाठी त्याकर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या बाजून निकाल दिल्यानंतर शासनाने त्यांना कायमसेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ९६ पैकी ६६ कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यात आले आहे. परंतु उर्वरीत गुन्हे दाखल असलेले व शैक्षणिक पात्रता नसलेल्यांना अद्याप सेवेत सामावून घेण्यात आलेले नसून त्यांच्याबाबतील शासनाकडे मार्गदर्शन मागविण्या आले आहे. मार्गदर्शन मागविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीत अतिष राणा व संजू परदेशीचे नाव होते. मात्र, आता संजू परदेशीवर गुन्हा दाखल झाल्याने त्याचाही कायम सेवेचा मार्ग बिकट झाला असून दोघांची सेवा समाप्त होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.