यावल : शेती मालाच्या वाढत्या चोर्यांमुळे शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे. यावल तालुक्यातील अट्रावल शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोदामातून हरभर्याचे 14 पोत्यांसह अन्य दोन पोते धान्य लांबवल्याने शेतकर्याला 24 हजारांचा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
24 हजारांचा आर्थिक फटका
यावल तालुक्यातील अट्रावल शिवारात किरण कडू महाजन यांचे शेत आहे. शेतात त्यांनी धान्य ठेवण्यासाठी गोदाम तयार केले आहे. या ठिकाणी ते धान्य व शेतातील माल ठेवतात. 13 मार्च रोजी रात्री 10 ते 14 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्याच्या शेतातील गोडावूनमधून 14 पोते हरभरे आणि 2 पोते धान्य लांबवले. गोदामाचा पत्रा उचकावून चोरट्यांनी प्रवेश केला. शेतकरी किरण महाजन यांनी यावल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे.