तिप्पट पैशांच्या आमिषाने धुळ्यातील चालकाला दोन लाखांचा गंडा

भुसावळ/जळगाव : तिप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने धुळ्यातील फागणे येथील वाहन चालकाची दोन लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन लाखांच्या बदल्या सहा लाखांच्या दिल्या बनावट नोटा
नथ्थू काशीनाथ कोळी (46, बाळापूर फागणे, ता.धुळे) हे वाहन चालक असून शुक्रवार, 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ते जळगावात आले. त्यावेळी त्यांची भैय्या महाजन (पूर्ण नाव माहित नाही), एक अनोळखी व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक धारक 9175087329 यांची ओळख निर्माण झाली. तिघांनी नथ्थू कोळी यांचा विश्वास संपादन करून घेतला. त्यांनी तुमचे पैसे तिप्पट करून देतो असे आमिष दाखविले. त्यानुसार नथ्थू कोळी यांनी जवळ असलेले दोन लाख रूपये दिले. त्यानंतर तिघांनी सहा लाख रूपये भरलेले बनावट नोटांची बॅग नथ्थू कोळी यांना देत पळ काढला.

एमआयडीसी पोलिसात तिघांविरोधात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नथ्थू कोळी यांनी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भैय्या महाजन (पुर्ण नाव माहित नाही), एक अनोळखी व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक धारक 9175087329 यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.