जळगाव : लहान मुलांच्या भांडणावरून बाप-लेकाला लाकडी दांडक्यासह कुर्हाडीने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. तालुक्यातील वराड बुद्रुक येथे ही घटना घडली. या प्रकरणी रविवार, 20 मार्च रोजी एमआयडीसी पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिता-पूत्रांना मारहाण
जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथे राजेंद्र कैलास जाधव (32) हे कुटुंबासह वास्तव्यास असून शनिवार, 19 मार्च रोजी लहान मुलांच्या भांडणावरून गावातील लक्ष्मण सपकाळे यांचे वडील व भाऊ राजेंद्र जाधव यांना शिवीगाळ करत होते. याचा जाब विचारण्यासाठी जाधव हे सपकाळे या कुटुंबांकडे गेले असता लक्ष्मण सपकाळे याने लाकडी दांडक्याने राजेंद्र जाधव यांच्या डोक्यावर व हातावर मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी राजेंद्र जाधव यांचे वडील कैलास विठ्ठल जाधव आले असता त्यांच्यावर राम हिरामण सपकाळे याने कुर्हाडीने वार केले. इतर दोघांनीही राजेंद्र जाधव व त्यांच्या वडिलांना लाकडी दांडक्यासह लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र जाधव व त्यांचे वडील दोघेही जखमी झाले. या प्रकरणी राजेंद्र कैलास जाधव यांच्या तक्रारीवरून लक्ष्मण हिरामण सपकाळे, राम हिरामण सपकाळे, रवींद्र हिरामण सपकाळे, हिरामण सोनजी सपकाळे (सर्व रा.वराड बुद्रुक) या चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहेत.