अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहने जिल्हा पेठ पोलिसांनी केली जप्त

जळगाव : जळगाव शहरातून मध्यरात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन वाहनांवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई केली. मंगळवार, 22 मार्च रोजी सकाळी ही वाहने जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
राष्ट्रीय महामार्गावरील एन.एन.वाईन शॉपसमोरून मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रक क्रमांक (एम.एच.04 ए.एल. 8768) यात बेकायदेशीर वाळू वाहतूक आढळली. या प्रकरणी कॉन्स्टेबल अमित कुमार मराठे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक स्वप्नील पुंडलीक नन्नवरे (बांभोरी, ता.धरणगाव) आणि मालक ज्ञानेश्वर दिनकर बाविस्कर (रा.पुनगाव, ता.चोपडा) या दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
दुसर्‍या कारवाईत शहरातील पिंप्राळा रोडवरील मानराज पार्कजवळ जिल्हापेठ पोलिस कर्मचारी गस्तीवर असतांना ट्रक (एम.एच. 19 झेड. 5762) मध्ये वाळू भरून वाहतूक करतांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे चार वाजता कारवाई केली. यात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमित ठाकरे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक विठ्ठल रामसिंग सोनवणे व गुलाब भिमराव नन्नवरे (रा.बांभोरी, ता.धरणगाव) यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.