जळगाव : शिवाजी नगरात गटारींवरील कन्व्हर्टर बांधकामासाठी लागणारे साहित्यासह सुमारे 200 किलो आसारी चोरट्यांनी लांबवल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा
शहरातील श्रद्धा कॉलनीतील रहिवासी मनोज सुनील पाटील (24) हे शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवाजीनगर, हमालवाडा, हुडको परीसरातील आरसीसी व स्लॅब बांधण्याचा ठेका घेतला आहे. दरम्यान शिवाजी नगर व हमाल वाड्यातील गटार व स्लॅबचे कामकाज चालू आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य या प्रभागातील नगरसेविका गायत्री शिंदे यांच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ठेवले होते. बुधवार, 23 रोजी सकाळी मनोज पाटील व त्यांचे वडील सुनील पाटील हे काम आटोपून सायंकाळी मनोज पाटील हे घरी गेले तेव्हा त्याठिकाणी आसारी पडल्या होत्या. दरम्यान, गुरुवार, 24 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांचे वडील पुन्हा त्याठिकाणी गेले असता, त्यांना तेथे आसारी दिसून आली नाही. शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन 11 हजार 200 रुपयांची आसारी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.