शहरातील जुन्या इमारतींतील मिळणार स्वतंत्र नळ कनेक्शन

 

जळगाव – शहरातील जुन्या इमारतीतील घरांना स्वतंत्र नळ कनेक्शन मिळणार आहे. याबाबतची विशेष बैठक महापौर दालनात घेण्यात आली होती. या बैठकीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक बंटी जोशी, नितीन बर्डे, भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका शुचिता हाडा आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षापासून जळगाव शहरात महत्त्वकांक्षी अमृत योजनेचे काम सुरू आहे. सुरू असलेल्या या अमृत योजनेच्या कामामुळे जळगाव शहरातील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र अजून 24 तास पाणी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने तात्पुरते नळ कलेक्शन बसवून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित विभागाला दिले आहेत. याचबरोबर एका इमारती मागे एक नळ कनेक्शन असे देखील धोरण अमृत योजनेवेळी ठरवण्यात आले आहे. मात्र जळगाव शहरातील कित्येक इमारती या जुन्या असल्याने त्या ठिकाणी टाकी बसवता येणार नाही.  आशा इमारतीतील नागरिकांना वेगवेगळे कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. इतकेच नव्हे तर ज्या जुन्या इमारतींमध्ये पाण्याची टाकी उपलब्ध नाही किंबहुना बांधणे शक्य नाही. अशा इमारतींतील नागरिकांना वेगवेगळे पाणी कनेक्शन उपलब्ध करून द्यावे असे निर्देश खुद्द मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी देखील दिले. यावेळी मनपा आयुक्त म्हणाले की ज्या इमारतींना स्वतःचे पाण्याची टाकी नाही किंबहुना टाकी बांधता येईल अशी जागा नाही अशा इमारतींसाठी योजनेअंतर्गत विशेष सवलत देण्यात आली असून त्या सवलती अंतर्गत जळगाव शहरातील जुन्या इमारतींना वेगवेगळे नळ कनेक्शन बसवून देता येणार आहेत.
जळगाव शहरातील नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील नागरिक वेळोवेळी जुन्या इमारतींना कनेक्शन देण्याच्या सूचना करत आहेत. यासंबंधी आज महापौर दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात होते. सर्वपक्षीय नगरसेवक मनपा आयुक्त महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेते संबंधित अधिकारी व पदाधिकारी या बैठकीला हजर होते.
त्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
जळगाव शहरात अमृत योजना आणण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे यामुळे अनधिकृत नळ कनेक्शन समोर येतील व जळगाव महानगरपालिकेचा महसूल वाढेल मात्र मनपाच्या काही अधिकाऱ्यांमुळे व अमृत योजनेची संबंधित असलेल्या काही खाजगी अधिकाऱ्यांमुळे जळगाव शहरातील कित्येक अनधिकृत नळ कनेक्शन हे अधिकृत करण्यात आले आहेत. अशा दोशी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
 
जुन्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा
घेण्यात आलेल्या बैठकीमुळे शहरातील जुन्या इमारतींमध्ये रहवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरातील जुन्या इमारतींमध्ये रहवास करणारे नागरिक आपापल्या प्रभागातील नगरसेवकांकडे यासाठी तक्रारी करत होते मात्र आज बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.