भुसावळातील रेल्वेच्या मलजल केंद्रात आग

भुसावळ : शहरातील रेल्वेच्या मल जल केंद्रातील झुडूपांना बुधवार, 30 मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली. भुसावळ नगरपालिका व आयुध निर्माणीच्या अग्नीशमन बंबांचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. गवत, पालापाचोळा व झाडाझुडपांमुळे आगीचे स्वरुप वाढण्याची भीती होती. वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्याने अनर्थ टळला. दरम्यान तापमान वाढीमुळे शहरात आगींचे प्रमाण वाढत आहे.

मलजल केंद्रात लागली आग
भुसावळ शहरातील 26 मार्चला पहाटे आग लागून एका वृध्दाचा बळी गेला. याच दिवशी ग्रामिण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या मागील भाग व सायंकाळी जामनेररोडवरील ट्रान्सफार्मरला आग लागली होती. बुधवारी पून्हा रेल्वेच्या मलजल केंद्रात आग लागली. या भागात रेल्वेने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले असून मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला आहे. या भागात बुधवारी आग लागल्याने पालापाचोळा गवत पेटून आगीची व्याप्ती वाढली. किमान एक एकरच्या परीसरातील गवताने पेट घेतला. मागील भागातील कवाडे नगरपर्यंत वणवा पेटला. परीसरातील नागरीकांनी तत्काळ पालिका व आयुध निर्माणी भुसावळच्या अग्नीशमन केंद्राला माहिती दिल्याने दोन्ही बंबांच्या माध्यमातून अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.