पवन एक्स्प्रेस अपघात : 23 तासानंतर डाऊन रेल्वे लाईनवर वाहतूक सुरळीत

‘सीआरएस’ करणार अपघाताची चौकशी : दुपारी 2.15 वाजता ‘गोदान’ धावली

भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द केल्या होत्या तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल केले होते. दरम्यान, सलग 23 तासाच्या मेहनतीनंतर रेल्वे प्रशासनाला रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात सोमवारी दुपारी दोन वाजता यश आले व दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास डाऊन गोदान एक्स्प्रेस अपघातग्रस्त मार्गावरून चालवण्यात आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

तीन प्रवासी जखमी : ‘त्या’ मयताचा अपघाताशी संबंध नाही
देवळाली-लहावीतदरम्यान डाऊन एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेसला अपघात घडला होता. नादुरुस्त रेल्वे रूळामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात तीन प्रवासी जखमी असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे तर घटनास्थळानजीक एका इसमाचा मृतदेहही आढळला होता मात्र हा मृतदेह रेल्वेतील प्रवाशाचा नसल्याची माहिती वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. जखमींमध्ये दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला असून एका प्रवाशाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

दहा वर्षातील सर्वात मोठा अपघात
लहावीतजवळ जेथे पवन एक्स्प्रेसला अपघात घडला तेथील मार्ग वळणाचा असल्याने अप-डाऊन मार्गाच्या रुळांमध्ये अंतर आहे. सुदैवाने अप लाईन काहीशी लांब असल्याने घसरलेले डबे त्या लाईनवर पडले नाहीत अन्यथा दोन्ही मार्ग क्षतीग्रस्त होऊन वाहतूक विस्कळीत झाली असती तर अपघात होण्याच्या 55 मिनिटांपूर्वी या मार्गावरून हावडा मेल मार्गस्थ झाली होती व त्यानंतर पवन एक्स्प्रेस आल्यानंतर अपघात घडला. दरम्यान, गेल्या दहा वर्षातील रेल्वेचा हा सर्वात मोठा अपघात असून यापूर्वी नोव्हेंबर 2013 मध्ये मंगला एक्स्प्रेसला घोटी-ईगतपुरीदरम्यान अपघात घडला होता व त्यात चार प्रवासी ठार होवून 39 प्रवासी जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली होती.

23 तासानंतर डाऊन मार्ग सुरळीत
पवन एक्स्प्रेसच्या अपघातानंतर भुसावळातील डीआरएम एस.एस.केडीया, एडीआरएम रुकवैय्या मीना, वरीष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे, वरीष्ठ मंडल इंजिनिअर राहुल अग्रवाल यांच्यासह इंजिनिअरींग व अन्य विभागातील वरीष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून होते. अपघातग्रस्त डबे रेल्वे रूळाच्या बाजूला करण्यात आल्यानंतर तब्बल 23 तासानंतर डाऊन लाईन सुरळीत करण्यात आली. अपघातामुळे सुमारे 300 मीटर अंतराचा रेल्वे मार्ग तुटल्याने नव्याने मार्ग तयार करण्यात आल्यानंतर सोमवारी 2.15 वाजता डाऊन लाईनीवरून गोदान एक्स्प्रेस चालवण्यात आल्यानंतर अधिकार्‍यांनी सुटकेचा श्वास घेतला.

रेल्वे अपघाताची ‘सीआरएस’ करणार चौकशी
पवन एक्स्प्रेस अपघाताची आता सीआरएस चौकशी होणार असून दोन दिवसात त्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला मिळाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या कमेटीत रेल्वे सेप्टी कमिश्नर, मुख्य अभियंता, मुंबई, भुसावळ डीआरएम तसेच वरीष्ठ मंडळ अभियंता (सामान्य), मंडळ अभियंता (साऊथ) आदी असतील. दरम्यान, मंगला एक्स्प्रेस अपघाताची सीआरएस चौकशी करण्यात आली होती व रेल्वेत मोठा अपघात घडल्यानंतर ही चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.