भुसावळात शवविच्छेदन सुरू न केल्यास तीव्र आंदोलन

आम आदमी पार्टीचा इशारा : प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; पालिका रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची मागणी

भुसावळ : भुसावळातील पालिका रुग्णालयात तब्बल दहा वर्षानंतर शवविच्छेदनाची सुविधा सुरू झाली पालिका व ट्रामा केअर सेंटरमधील डॉक्टरांमधील सुंदोपसुंदीमुळे शवविच्छेदन करण्यास अडथळा निर्माण झाल्याने सर्वसामान्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. या संदर्भात आम आदमी पार्टीने प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देवून पालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शवविच्छेदनाअभावी होताय हाल
रेल्वेचे जंक्शन असलेल्या शहराला लागून गेलेला राष्ट्रीय महामार्ग व शहरातील तीन स्थानिक पोलिस ठाणे व होणार्‍या अपघाताच्या घटना पाहता शहरात स्थानिक स्तरावर शवविच्छेदनाची सुविधा सुरू असणे गरजेचे होते मात्र डॉक्टरांमधील वादामुळे शवविच्छेदनास अडचणी निर्माण झाल्याने मृताच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना सोसावा लागत आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीने प्रांताधिकारी व पालिका प्रशासन रामसिंग सुलाणे यान निवेदन देवून 15 दिवसात पालिका रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची शवविच्छेदन करण्यासाठी नियुक्ती करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदनावर यांच्या स्वाक्षर्‍या
निवेदनावर आम आदमी पार्टीचेभुसावळ तालुका संयोजक प्रमोद वसंत पाटील, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, जिल्हा संयोजक इर्षाद खान, युवा शहर संयोजक करण लखन, सदस्य जितेश कच्छवे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.