धोक्याचा लाल सिग्नल ओलांडताच तिघा लोकोपायलटची सेवा समाप्ती : रेल्वेच्या मनमानीविरोधात भुसावळात आंदोलन
भुसावळ : रेल्वे प्रशासनाने मनमानी पद्धत्तीने लाल सिग्नल पास झाल्यानंतर तीन लोको पायलट यांना थेट कार्यमुक्त केल्यानंतर संतप्त 200 लोको पायलटांनी मंगळवारी येथील डीआरएम कार्यालय गाठत रेल्वे प्रशासनाच्या सुरू असलेल्या दादागिरीविरूध्द घोेषणाबाजी करीत रेल्वे प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केले.
जोरदार घोषणाबाजी
तीन लोको पायलट यांनी लाल सिग्नल पास केल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करून रेल्वे अधिकार्यांनी मनमानी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी डीआरएम कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षा देणे अत्यंत अयोग्य असल्याने संतप्त झालेल्या लोको पायलटांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता डीआरएम कार्यालय गाठत रेल्वे प्रशासनाच्या विरूध्द घोषणाबाजी केली. लोकोपायलट यांच्या कार्यमुक्तीचे आदेश मागे घेतले नाही तर लोको पायलट रेल्वे गाड्यांचा चक्का जाम करतील, असा इशारा उपस्थितांनी दिला. यावेळी सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया, एस.बी.पाटील, ए.के.तिवारी, के.पी.चौधरी, अजय मालवीय, आर.के. मेघराज, प्रवीण पाटील, किशोर कोलते, ललित मुथा आदी उपस्थित होते.
अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
मेमू गाडीत असिस्टंट लोको पायलट यांची ड्युटी लावावी, रनिंग स्टॉफच्या रीक्त जागा तत्काळ भराव्यात, डीएआरच्या प्रकरणात रेल्वे बोर्डाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करावे, मालगाडी वरील स्टॉफला मुख्यालयातून थ्रू चालविणे बंद करावे, खंडवा येथील रनिंग रूमध्ये नवीन बेडची व्यवस्था करावी, रनिंग रूममधील जेवणाची क्वॉलिटी चांगली केली जावी, सर्व लॉबीमध्ये आरओ वॉटरच व्यवस्था करावी आदी मागण्यांची मागणी लोको पायलट यांनी केली. याबाबत रेल्वे प्रशासनाला सेंट्रल रेल्वे मजूदर संघाच्या रनिंग शाखेतर्फे निवेदन देण्यात आले.