झिरो लोडशेडींगमुळे शेतकरी झाले हैराण

Zero Load Shedding रावेर : रावेर तालुक्यातील शेती शिवारात वीज महावितरण कंपनीकडून अचानक लोडशेडिंग राबवले जात असल्याने शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतात वीजपुरवठा नसल्याने याचा केळी पिकाला मोठा फटका बसण्याची भीती आहे. पुढील दोन ते तीन दिवस झिरो लोडशेडींगची समस्या अशीच राहण्याची शक्यता महावितरण कंपनीकडून वर्तवण्यात आली आहे.

केळी बागांना फटका बसण्याची भीती
रावेर तालुक्याला उष्णतेच्या झळा बसत असतांना महावितरण विभागाकडून अचानक झिरो लोडशेडिंग राबवले जात असल्याने याचा फटका केळी पिकाला बसत आहे. पाणी वेळेवर मिळत नसल्याने केळीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार शिरीष चौधरी यांनीदेखील वीज महावितरणच्या वरीष्ठ अधिकार्‍यांशी बोलणे करून झिरो लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेत्यांकडे केली तक्रार
रावेर तालुक्यातील अहिरवाडी, केर्‍हाळा, पाल, रसलपूर परीसरातील शेतकर्‍यांचे विजेअभावी केळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या परीसरातील शेतकर्‍यांनी भाजपा पदाधिकारी संदीप सावळे यांच्याकडे शेतीच्या विजेसंदर्भातील समस्या मांडली. सावळे यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकार्‍यांशी बोलणे करून समस्या सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी थेट राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून शेतकर्‍यांची समस्या सोडवण्याची मागणी केली तर उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडेही तक्रार केली आहे.

त्वरीत वीजपुरवठा द्यावा : महावितरणला अल्टीमेटम
तांदलवाडी परीसरातदेखील शेत-शिवारात विजेच्या झिरो लोडशेडिंगची (Zero Load Shedding) समस्या कायम असल्याने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याची मागणी केली असता अधिकार्‍यांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. या प्रकाराने संतापलेले महाजन यांनी रात्रीची बंद असलेली लाईट त्वरीत द्यावी व उद्यापासून वीजपुरवठा सुरळीत न केल्यास सावदा कार्यालयावर शुक्रवार, 8 रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा देत परीरातील शेतकर्‍यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले आहे.