रमजानच्या महिन्यात वीज पुरवठा खंडित करु नये

जामनेरला खिदमतगार फलाही एज्युकेशन तंझीमतर्फे वीज महावितरणच्या कार्यालयात निवेदन

जामनेर । वीज महावितरणतर्फे वेळोवेळी खंडित केला जाणारा वीज पुरवठ्याला सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. अशातच मुस्लिम बांधवांच्या ऐन पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली आहे. अशावेळी फक्त गांधी चौकातून पुढे जुना बोदवड रोड, बिस्मिल्ला नगरपर्यंत वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ऐन रमजान वेळी मुस्लीम वस्तीमधली वीज पुरवठा 6 तास खंडित होत आहे. याबद्दल लोकांमध्ये भ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे रमजानच्या महिन्यात महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करु नये, अशा आशयाचे निवेदन खिदमतगार फलाही एज्युकेशन तंझीममार्फत महावितरण कंपनीच्या कार्यालयात नुकतेच देण्यात आले.

उन्हाळा सुरू झाला आहे व भर उन्हात पवित्र रमजान महिण्याची सुरुवात झालेली आहे. त्यात मुस्लिम समाजातील लहानपणापासून ते प्रौढापर्यंत सर्व उपवास (रोजा) करतात. रमजान महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाने थैमान घातले आहे. उन्हाचा पारा 43-44 अं.से. इतका पोहचलेला आहे. इतक्या उन्हात उपवास करणे कठीण असते. त्यात मुस्लिम समाजातील रोजे ठेवलेल्या व्यक्तीला सूर्य उगवल्यापासून ते सूर्यस्थापर्यंत ‘ना पाणी, ना जेवण’ चालत नसल्याने उपाशीपोटी त्यांना रोजा पूर्ण करावा लागतो. त्यामुळे भर उन्हात उपवास करणे खूप त्रासदायक असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अशीही मागणी होत आहे.