नगरविकास विभागाच्या आदेशानंतर भुसावळ पालिका प्रशासन कामाला
लवकरच होणार पालिका निवडणूक : प्रारुप प्रभाग रचनेसाठी सूचना
भुसावळ : राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार पालिकेने प्रारुप प्रभाग रचना केली होती. ही रचना प्रसिध्द झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत प्रभाग रचना, सीमांकन, मतदारसंंख्या आदींबाबतचे अधिकार राज्य शासनाकडे घेण्याचा कायदा केला होता तर ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डेटा न्यायालयात दिला जाणार असल्याने निवडणुका लांबल्याने इच्छुकांच्या स्वप्नांवर विरजण पडले मात्र आता नगररचना विभागाच्या आदेशानंतर इच्छुकांना पुन्हा बळ आले आहे तर पालिका प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या, रचना निश्चित करुन प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी सोमवारी काढले आहेत.
प्रभाग रचनेबाबत आदेशात सूचना
सोमवार, 11 एप्रिल रोजी नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी जिल्हाधिकार्यांना आदेश काढून मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या नगरपरीषद, नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या, रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, सदरची कार्यवाही संदर्भीय अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 27 डिसेंबर 2021 व त्यानंतर वेळोवेळीच्या आदेशान्वये सुधारित होणार्या कार्यपध्दतीस अनुसरुन करण्यात यावी, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, पूर्वीच्या सूचनांप्रमाणे 24 ऐवजी 25 प्रभाग होतील. तर 48 ऐवजी 50 नगरसेवक संख्या असेल, असा अंदाज आहे.