जळगावातील फुले मार्केटमधील पांचाली साडी दुकानाला आग : लाखोंचे नुकसान

जळगाव : शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या फुले मार्केटमधील पांचाली साडी या दुकानाला अचानक शनिवारी रात्री आग लागली. शॉर्टसर्किटने ही आग लागली असल्याचे समजते. या आगीत लाखो रुपये किंमतीच्या साड्या जळूक खाक झाल्याचा अंदाज आहे.

लाखो रुपयांचा आर्थिक नुकसान
जळगावातील फुले मार्केटमध्ये प्रसिद्ध पांचाली नावाने साड्यांचे दुकान आहे. या दुकानाला शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच नागरीकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवताच घटनास्थळी तातडीने महापालिकेचे अग्निशमन विभागाचे दोन बंब हजर झाले. त्यापैकी एका अग्निशमन बंबातून पाण्याचा मारा करत अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत नेमके किती नुकसान झाले ते कळू शकलेले नाही मात्र दुकानातील साहित्य तसेच साड्या जळून मोठ्या प्रमाणावर जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.