शेती नावावर करण्यासाठी धुळ्यात सुनेला विष पाजले : चुलत सासू-सासर्‍यासह चौघांवर गुन्हा

धुळे : देवपुरातील वाडीभोकररोड परिसरात असलेल्या आधारनगरात गरोदर सुनेला बळजबरी विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या चुलत सासू-सासर्‍यासह चौघांवर रविवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीत पसार
आधारनगरात राहणार्‍या आशाबाई बाळासाहेब पाटील (25) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार गोंदूर शिवारात असलेले शेत नावावर करावे. यासाठी चुलत सासरा मधुकर फुला पाटील, नलिनी मधुकर पाटील, देवदत्त मधुकर पाटील, शिवदत्त मधुकर पाटील (चौघे रा. मयूर शाळेजवळ, धुळे) हे घरी आले. चौघांनी वाद निर्माण करून शिवीगाळ, दमदाटी केली तसेच मारहाण करून बळजबरीने विषारी औषध पाजले. त्यानंतर चौघे पसार झाले आहे.

चौघांविरोधात गुन्हा
सुमारे पाच महिन्यांची गरोदर असलेल्या आशा पाटील यांना देवपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जबाबावरून रविवारी दुपारी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.