नंदुरबार : धान्याची वाहतूक करणारा ट्रक अडवत चालक-क्लिनरचे अपहरण करीत ट्रक सोडण्यासाठी पाच लाखांची मागणी करणार्या दहा जणांविोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 22 रोजी नंदुरबार-नवापूर रस्त्यावर घडली. दरम्यान दरोडेखोरांनी चालक व क्लिनरचे दोन मोबाईल व 18 हजारांची रोकड लांबवली असून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रक सोडण्यासाठी पाच लाखांची मागणी
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 रोजी पावणे नऊ वाजेच्या सुमारास विजय फत्तेचंद अग्रवाल (33) यांच्या मालकीचे धान्य ट्रक (क्र.टी.एस.15 यु.डी 3943) मधून नेण्यात येत असताना नंदुरबार-शिवण रस्त्यावर शिवण नदीजवळ पेट्रोलपंपाजवळ सदर ट्रक विशाल रणछोड गावीत (25, रा. पातोंडा, ता.जि.नंदुरबार), मनिष उर्फ बंटी भगवान महाले (27, रा.आष्टा, ता.जि.नंदुरबार), सागर रतीलाल पाडवी, मुन्ना गावीत, जय वळवी, विक्की मोरे, राजा मराठे, नितेश वळवी, भिमा माळी, बबल्या माळी यांनी अडवत चालक व क्लिनरचे अपहरण केले व ट्रक सोडविण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. चालक व सहचालकाला मारहाण करुन त्यांच्याजवळील दोन मोबाईल व 18 हजाराची रोकड काढून घेतली. याबाबत विजय अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत.