भुसावळ : भुसावळचे उद्योजक तथा बियाणी मिलिटरी स्कूलचे संचालक मनोज बियाणी यांच्या मालकीची 40 लाखांची रोकड असलेली बॅग संगीतम ट्रॅव्हल्समधून चोरट्यांनी भुसावळ-मुंबईदरम्यानच्या प्रवासात लांंबवली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिनाभरापूर्वी झाली होती चोरी
उद्योजक मनोज बियाणी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दिलेल्या त्यांचे निकटवर्तीय संजय पुरूषोत्तम तिवारी (रा. मधु डेअरी समोर, विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ) हे संगीतम ट्रॅव्हल (क्रमांक एम.एच.03 सी.पी. 3477) ने भुसावळ-नाशिक दरम्यान प्रवासासाठी 28 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निघाले होते मात्र त्यांनी रोकड असलेली बॅग लक्झरीच्या डिक्कीत ठेवली व रात्री त्यांना झोप लागल्याने अज्ञात चोरट्याने ही बॅग लांबवली. नाशिक आल्यानंतर तिवारी यांना रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी बियाणी यांना सूचित केल्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. तब्बल महिनाभराच्या अंतराने पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी रात्री मनोज बियाणी यांच्या फिर्यादीनुसार गुरनं.262/2022, भादंवि 379 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.