भोरटेकला दंगल, दुचाकी जाळल्या ; चारचाकीचे नुकसान : तुंबळ हाणामारीत सात जण जखमी

दोन्ही गटातील 22 जणांवर गुन्हा दाखल : पोलिसात तक्रार दिल्यानंतर उफाळला वाद

यावल : तालुक्यातील भोरटेक येथे पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून दोन गटात दंगल झाली. तुफान हाणामारीत एकमेकांवर हल्ले करण्यात आल्यानंतर दोन्ही गटातील सात जण जखमी झाले. या दंगलीत दुचाकी जाळण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात दोन्ही गटांकडून 22 जणांवर दंगल, विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

फैजपूर पोलिसात दोन्ही गटाविरोधात गुन्हा
भोरटेक, ता.यावल येथील विनोद उर्फ स्वामी रवींद्र कोळी (28) यांनी फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गावात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मागील एका भांडणात पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून गावातील भास्कर रमेश कोळी, बंटी भास्कर कोळी, गोकुळ मधुकर कोळी, किशोर संजु कोळी,गोलु संतोष कोळी, धनराज आनंदा कोळी, रमेश भागवत कोळी, योगेश अनिल कोळी, जितेंद्र मधुकर कोळी, डीगंबर संतोष कोळी व अरुण रमेश कोळी या सर्व 11 जणांनी त्यांच्या सह त्यांचे काका लिलाधर मोतीराम कोळी, वडील रवींद्र मोतीराम कोळी, आई नर्मदा रवींद्र कोळी व भाऊ मनोज रवींद्र कोळी यांच्यावर लाठ्या-काठ्या घेवुन हल्ला केला. यात चौघे जण जखमी झाले. या हाणामारीत चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली व दोन दुचाकी जाळण्यात आल्या व दोन दुचाकींचे तोडफोड करून नुकसान करण्यात आले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किरण चाटे करीत आहे.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
भास्कर रमेश कोळी (42, रा.भोरटेक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामचंद्र मोतीराम कोळी यांच्यावरूध्द पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याचे वाईट वाटुन संशयीत आरोपी विनोद उर्फ स्वामी रवींद्र कोळी, रवींद्र मोतीराम कोळी, मनोज रवींद्र कोळी, गोटु रामचंद्र कोळी, रामचंद्र मोतीराम कोळी, लिलाधर मोतीराम कोळी सलिन लिलधार कोळी (रा.भोरटेक) तसेच किरण कोळी, रोहित मोहन तायडे, वैभव हेमंत कोळी (तिघे रा.पाडळसे, ता.यावल) व पंकज कोळी (बामणोद, ता.यावल) अशा 11 जणांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भास्कर कोळी यांच्या घरात येवून लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात भास्कर कोळींसह अरुण रमेश कोळींसह महिला असे तिघे जखमी झाले. यात संबंधीतांना अश्लील शिविगाळ करीत महिलांचे विनयभंग केला असल्याची तसेच दुचाकीची तोडफोड करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी 11 जणांविरूध्द दंगल, विनयभंगा सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहेत.