मुंबई : मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतल्यानंतर त्यांच्या अडचणीत सतत वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईत झालेल्या गदारोळानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली असून त्याच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दाम्पत्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राणा दाम्पत्याच्या वाढल्या अडचणी
राणा दाम्पत्याविरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरून दिले आव्हान
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकीलाकडून राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. अॅड.रीझवान मर्चंट आण अॅड वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली तर प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली.