जळगावात स्कूल बसच्या धडकेने पतीचा जागीच मृत्यू ; पत्नी गंभीर

जळगाव : भरधाव स्कूलने दाम्पत्याला उडवल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नेक्सा शोरूमजवळ सोमवार, 25 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात गफ्फार सुलेमान पिंजारी (54, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी रईसा बी.पिंजारी या गंभीर जखमी झाल्या.

पायी फिरायला जाताना दुर्घटना
गफ्फार पिंजारी हे पत्नी रईसाबी व मुलांसह सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होते. दररोज पहाटे वाजता शतपावली करण्यासाठी त्यांची सवय असल्याने सोमवारी पहाटे सहा वाजता गफ्फार पिंजारी व त्यांची पत्नी रईसाबी हे दोघे शतपावली करण्यासाठी निघाले असताना राष्ट्रीय महामार्गावरील नेक्सा शोरूमसमोर टाटा मॅजिक स्कूल बस (एम.एच.19 डी.वाय. 9034) ने जोरदार धडक दिल्याने गफ्फार पिंजारी हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी रईसाबी ह्या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी धाव घेतली. मयत पिंजारी यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली असा परीवार आहे. याप्रकरणी जाफर गफ्फार पिंजारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.