साकळी शिवारात केळी बागेला आग : 15 लाखांचे नुकसान
केळी उत्पादकावर कोसळले संकट : साकळी शिवारातील दुर्दैवी घटना : पंचनाम्याच्या सोपस्कारासह भरपाई हवी
यावल : केळी उत्पादकांवरील संकट थांबायला तयार नाही. वीज तारांमध्ये झालेल्या घर्षणानंतर शॉर्ट सर्किट होवून केळी बागेला आग लागल्याने सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. तालुक्यातील दहिगावच्या शेतकर्यावर कोसळलेल्या संकटामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दहिगावच्या शेतकर्याचे साकळी शिवारात शेत असून केळी बागेला मंगळवारी दुपरच्या सुमारास आग लागल्याने 15 लाखांचे नुकसान झाले.
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
शेतातील विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा शेतकर्याने केला आहे. दहिगाव, ता.यावल येथील शेतकरी महेश पांडुरंग पाटील यांची साकळी शेत-शिवारात शेती असून शेत गट क्रमांक 731 च्या क्षेत्र दोनमध्ये त्यांनी सात हजार 500 खोडांची केळी लागवड केली होती. यातील काही प्रमाणात केळीची कापणी झाली होती व पिल बाग त्यांनी ठेवला होता तसेच या पिल बागाला पाणीपुरवठा करण्या करीता त्यांनी शेतात पाईपलाईन टाकली होती मात्र या शेतात मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आगीमुळे केळीच्या पिकासह शेतातील पाईप लाईन, ठिबक नळया जळून खाक झाल्या. या घटनेत शेतकर्याचे सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. आगबाबत वीज वितरण कंपनी तसेच महसूल विभागाला कळविण्यात आले आहे.