वारकरी संप्रदायाच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर चाळीसगावातील निरीक्षकांचा ‘माफीनामा’

चाळीसगाव : चाळीसगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांनी नारदाच्या गादीचा केलेल्या अपमानानंतर राज्यातील वारकरी संप्रदाय संतप्त झाल्यानंतर निरीक्षक के.के.पाटील यांनी माफि मागितली आहे तर अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांना मोठ्या मनाने माफ करावे, असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

वारकरी संप्रदाय संतप्त
चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर परीसरातील संतोषी माता मंदिराजवळ कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम बुधवारी रात्री 10 वाजेनंतर सुरू असल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन सदर माईक बंद केला तसेच वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवले गेल्याची घटना घडल्यानंतर त्याबाबतचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच राज्यभरातील वारकारी संप्रदाय व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

निरीक्षकांनी मागितली माफी
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनादेखील ही बातमी कळताच त्यांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मान्यवर व पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या उपस्थितीत अंत्योदय जनसेवा कार्यालयात बैठक घेतली. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेला साक्षी ठेवून अनावधानाने घडलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली.

आमदार म्हणाले ः अशा घटनांची टळावी पुनरावृत्ती
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, मी स्वतः वारकरी पुत्र असल्याने माझ्याही भावना दुखावणे साहजिकच होते मात्र तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांचे काम, त्यांनी शहरातील अवैध धंदे, मुलींची छेड गाडणारे गावगुंड यांचा केलेला बंदोबस्त व आजवरची त्यांची कामगिरी माझ्यासह चाळीसगाव शहराने अनुभवली असल्याने या सर्व विषयावर पडदा पडावा तसेच सर्व समाजाला सदर घटनेतील पोलीस प्रशासनाची बाजू कळावी या उद्देशाने चाळीसगाव शहरातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व मान्यवर मंडळी सोबत त्यांची बैठक गुरुवारी चाळीसगाव येथील कार्यालयात घडवून आणली असल्याचे सांगितले. पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचनादेखील पोलीस प्रशासनाला केल्या.
गेली दोन वर्ष कोविडमुळे कीर्तन बंद होते, चाळीसगाव तालुक्यात आता कुठे काही प्रमाणात कीर्तन सप्ताह सुरु झाले असून त्यासाठी पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांची वेळोवेळी मदत झाली असल्याचे उपस्थित कीर्तनकार व मान्यवर यांनीदेखील मान्य केले व हा विषय आम्ही इथेच थांबवीत असल्याचे जाहीर केले. यापुढे सोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये, असेदेखील आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी ह.भ.प.राम महाराज, ह.भ.प.सुधाकर तात्या, ह.भ.प. ए.बी.पाटील, ह.भ.प.ओझर लिलाधर महाराज, ह.भ.प.राम महाराज, पातोंडा येथील ह.भ.प.अल्केश महाराज, ह.भ.प. विनय महाराज, हिरापूर, ह.भ.प.मयूर महाराज, ह.भ.प. रोहिदास महाराज, ह.भ.प.उदय महाराज, ह.भ.प.विनीत महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हा समन्वयक भूषण पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाराज आदी उपस्थित होते.