भुसावळ : जिल्हा नियोजन समितीकडून भुसावळात शहरातील विविध वर्दळीच्या भागात सीसीटीव्ही बसवण्यासाठी 20 लाख रुपये मिळणार असून लवकरच हे कॅमेरे शहरात लावण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नेहमीच सर्वच पक्षांनी टिकेची झोड उठवली आहे तर शहरातील आहे ते सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने गुन्हेगारांसाठी ही बाब पथ्यावर पडल्याने सातत्याने सीसीटीव्हीचा प्रश्न उपस्थित होत असल्याने भुसावळचे आमदार सावकारे यांनी डीपीडीसीकडे निधी मिळण्यासंदर्भात मागणी केली असून त्या संदर्भात निधी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवण्यात आली आहे.
वाढदिवसानिमित्तचा निधी सामाजिक उपक्रमासाठी खर्च करणार
भुसावळ शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून त्याजागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 20 लाखांची मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली आहे. दरम्यान, आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय सावकारे मित्र मंडळाकडून पैसा जमवून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार होते मात्र तो निधी अन्य सामाजिक कामासाठी खर्च केला जाणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
तीन वर्षांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंदच
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या तीन वर्षापासून बंद असून दुसरीकडे गुन्हेगारी वाढली आहे. ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरातील प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार संजय सावकारे यांच्या मित्र परीवाराने निधी जमा केला. त्यातून पोलिस ठरवतील त्या ठिकाणी कॅमेरे लावले जाणार होते. प्रायोगिक तत्वावर दोन ते तीन ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले मात्र आता जिल्हा नियोजन समितीकडून शहरातील कॅमेर्यांसाठी 20 लाखांचा निधी लवकरच मिळणार असल्याने काही प्रमाणात सीसीटीव्हीची समस्या मार्गी लागणार आहे.