यावल : तालुक्यातील मालोद येथील एक वर्षीय चिमुकलीच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने ती गंभीर भाजली होती. गेल्या 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरती कैलास भील (वय एक, मालोद, ता.यावलत्र असे मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
झुंज ठरली अपयशी
आरती भील ही चिमुकली आपल्या आई-वडीलांसह वास्तव्यास होती. आई-वडील हे शेतात मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 21 एप्रिल रोजी सकाळी घरात चुलीवर अंघोळीसाठी पाणी तपाविण्यासाठी ठेवले होते. त्यावेळी चिमुकली खेळत असतांना अचानक चुलीवरील भांड्यातील उकळते पाणी खाली पडल्याने बाजूला असलेली आरती ही गंभीररित्या भाजली गेली. तिला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 12 दिवसांपासून चिमुकलीची मृत्यूशी असलेली झुंज संपली. सोमवार, 2 मे रोजी रात्री 11.30 वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे भील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने यावल पोलिसात वर्ग करण्यात आली. प्राथमिक तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहे.