धुळे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत दिलेल्या अल्टीमेटमनंतर धुळ्यातील मनसे पदाधिकारी बुधवार, 4 रोजी शिवतीर्थावर जमले मात्र त्याचवेळी धुळे शहर पोलिसांनी धाव घेत नऊ पदाधिकार्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्या हातातील भोंगादेखील जप्त करण्यात आला. याप्रसंगी पदाधिकार्यांनी आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहर पोलिसांनी पदाधिकार्यांना तत्काळ ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले.
या मनसे पदाधिकार्यांवर कारवाई
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अॅड.दुष्यंत राजन देशमुख, मनसेचे जिल्हा सरचिटणीस संदीप जगन्नाथ जडे, मनसे धुळे तालुकाध्यक्ष संतोष पांडुरंग मिस्त्री, मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष संध्या सतीश पाटील, उपजिल्हाध्यक्ष स्वाती मनोज जाधव, शहर उपाध्यक्ष प्रशांत महेंद्रलाल तनेजा, राजेश अशोक दुसाणे, विभाग अध्यक्ष योगेश नरहर वाणी, हरीश किशोर जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर मुंबई पोलिस कायदा कलम 68 अन्वये कारवाई करण्यात आली व नंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले.
आघाडी सरकारचा पदाधिकार्यांकडून निषेध
मनसे पदाधिकार्यांना पोलिसांच्या वाहनातून शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले व यावेळी पदाधिकार्यांनी जय श्रीराम, जय हनुमान अशा जोरदार घोषणा दिल्या तसेच आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत सदर अटक ही हिंदूंचा आवाज दाबला जावा यासाठी असली तरी आम्ही हे सहन करणार नाही, अशा घोषणाही देण्यात आल्या.