यावल : महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून शहरातील पटेल वाडा भागातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय तरुणावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोर फैजपूरातील असल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक सदर तरुणाचा जवाब घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना झाले आहे. जावेद युनूस पटेल (23, पटेलवाडा, यावल) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
अनैतिक संबंधावरून तरुणावर हल्ला
जावेद पटेल या तरुणाचे एका भागाातील महिलेशी संबंध असल्याने त्यातून त्यांचे गुरुवारी वाद झाले होते व त्यानंतर तरुणाला तिघा संशयीताने घराबाहेर बोलावून दुचाकीवरून भुसावळ रस्त्यावर असलेल्या घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ नेले व तेथे त्यांच्यावर पुन्हा वाद झाल्याने तिघांनी चाकूने वार करीत तरुणाीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाहनधारक हा प्रकार पाहत असतानाच संशयीतांनी धूम ठोकली तर जखमी अवस्थेतील जावेद पटेल याने नातेवाईकांना माहिती दिली व त्याला तातडीने रात्रीच ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.
जवाबानंतर कळणार स्पष्ट घटना
तरुणावर चाकूहल्ला झाल्याची बातमी शहरात समजताच एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी जावेद पटेल याचा जवाब घेण्यासाठी यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशीत कांबळे व पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर हे जळगावी रवाना झाले आहेत. तरुणाच्या जवाबानंतर हल्ल्याचे स्पष्ट कारण व संशयीतांची नावे समोर येणार आहेत.