विद्युत पंपाची चोरी : तिघे आरोपी जळगाव तालुका पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : तालुक्यातील आसोदा आणि करंज येथील विहिरीतील विद्यूत पंपाची चोरी करणार्‍या तीन संशयीतांना जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली. तिघांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जितेंद्र परल्या बारेला, जितेंद्र भगवान कोळी आणि अविनाश वसंत भील (सर्व रा.अट्रावल, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

शेती साहित्याच्या चोर्‍यांमुळे शेतकरी त्रस्त
तालुक्यातील आसोदा येथील ग्रामपंचायत मालकीच्या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीतून अज्ञात चोरट्यांनी केबल व विद्यूत पंपाची चोरी केली तसेच तालुक्यातील करंज येथील शेतकरी संजय जीवराम सपकाळे, शंकरलाल भावजी सोनवणे, भगीरथ भावजी सोनवणे आणि रवींद्र नीळकंठ पाटील (सर्व रा.करंज, ता.जळगाव) या चार शेतकर्‍यांच्या शेतातून 4 मार्च रोजी विद्यूत पंप आणि केबल चोरून नेण्यात आली होती. जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे गुन्हे अट्रावलच्या संशयीतांनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 10 हजार 850 रुपये किंमतीची 25 किलो कॉपर वायर हस्तगत करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक सपकाळे, हवालदार वासुदेव मराठे, ईश्वर लोखंडे, बापू पाटील, साहेबराव पाटील, संदीप पाटील, प्रशांत पाटील, बापू कोळी, जयेंद्र पाटील आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.