वाळूची चोरटी वाहतूक : चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅक्टर पकडले

चाळीसगाव : शहरातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरला पोलिसांनी गुरुवारी पकडले. या प्रकरणी शहर पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रॅक्टरासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
तालुक्यातील डेराबर्डी कडून शहराकडे येणार्‍या एका विना नंबरच्या ट्रॅक्टरवर पोलिसाचा संशय आल्यानंतर शहर पोलिसांनी ट्रॅक्टरला थांबवून कसून चौकशी केली. त्यावेळी ट्रॉलीत सातहजार रुपये किंमतीची सव्वा ब्रास गौण खनिज (वाळू) आढळले. शहर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा महेंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, 50 हजार रुपये किंमतीची तपकिरी रंगाची ट्रॉली व सात हजार रुपये किंमतीची वाळू मिळून चार लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, 12 रोजी सकाळी सात वाजता करण्यात आली. निखील सुनील कुढे (23, एम.जे.नगर, चाळीसगाव) या संशयीतांविरोधात विजय रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास नाईक भूषण पाटील करीत आहेत.