नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 10 जून 2022 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे आहे. भारत निवडणूक आयोगाने गुरुवारी महाराष्ट्रासह 15 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 57 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
या खासदारांची संपणार मुदत
महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रीक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी 10 जून 2022 ला निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी 24 मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 31 मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 1 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 3 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. 13 जून 2022 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपेल.