भुसावळात रेल्वे समिती सदस्यांनीच पकडले फुकटे प्रवासी

अधिकार्‍यांची कान उघाडणी : सफाई कामगारांचा ठेका रद्दची शिफारस

भुसावळ : भुसावळ दौर्‍यावर आलेल्या रेल्वे समिती सदस्यांनी फुकट्या रेल्वे प्रवाशांना पकडून देत अधिकार्‍यांच्या डोळ्यात अंजन घातले तर असुविधांबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत झाडाझडती घेतली. रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता पाहून सफाई कर्मचर्‍यांचा ठेका रद्द करण्याच्या सूचना करण्यात आल्या. गुरुवारी तब्बल दोन तास भुसावळ जंक्शनची तपासणी सुरूच होती.

अस्वतेमुळे समितीचा संताप
सोमवारपासून विभागातील विविध रेल्वे स्थानकांची समिती सदस्यांनी पाहणी केली. अकोला, खंडवा मार्ग पाहून आल्यावर गुरूवारी सकाळी नऊपासून भुसावळ जंक्शन स्थानकाची पाहणी करण्यात आली. समितीत समिती प्रमुख डॉ.राजेंद्र फडके, कैलास वर्मा (मुंबई), विद्या अवस्थी (रायपूर), अभिलाश पांडे (जबलपूर) व छोटू भाई पाटील (सूरत) या सदस्यांचा समावेश होता. दोन पथके तयार करीत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहणी करण्यात आली तर वेटींग रूममधील काही नळ बंद असल्याने ते नळ सुरू करण्याच्या सूचना केल्यात. डॉ. फडके यांनी प्लॅटफॉर्म चारवर अस्वच्छता दिसल्याने त्यांनी ठेकेदार व अधिकार्‍यांची कान उघाडणी केली. अश्या ठेकेदारांचा ठेका रद्द करावा, असे सूचित करून याची गंभीर नोंद घेतली. पार्कीग ठेकेदाराला दहा हजार रूपयांचा दंड करण्याच्या सूचना सदस्य डॉ.फडके यांनी केली.