कंजरवाडा परिसरातील प्राणघातक हल्यातील संशयीत पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : जुना वाद मिटवण्याचा बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील कंजरवाडा परीसरात घडली होती. या प्रकरणी एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. आकाश अरुण दहेकर (34, रा.कंजरवाडा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जुन्या वादातून प्राणघातक हल्ला
3 मे रोजी आकाश अरुण दहेकर (34, कंजरवाडा, जळगाव) याने रामनवमीच्या दिवशी झालेला वाद मिटवण्यासाठी कंजरवाडा परिसरात बोलावले होते. त्यानुसार आकाशसोबत ललित दिक्षीत, बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी असे सर्वजण तेथे गेले. त्यावेळी मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबु कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतरांनी त्यांच्यावर हल्ला केला. आकाश दहेकर याने बबलू धनगर याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला मात्र तो हल्ला बबलु याने चुकवला. मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबू कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतर अनोळखी काही तरुणांनी हल्ला केला. यात वाहनांचेदेखील नुकसान झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात या आकाश दहेकर यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अटकेतील आरोपी सराईत गुन्हेगार
अटकेतील आकाश दहेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध धुळे शहर, रामानंद नगर जळगाव आणि जिल्हा पेठ जळगाव या पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे व किरण पाटील करीत आहेत.