एरंडोल : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून पोलिसात नेण्याचे सांगताच वाळू माफियांनी मंडळाधिकाऱ्यांला ओढाताण करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंडळाधिकारी यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू माफियांची मुजोरी
कासोदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद मेघशाम गायधनी (56, रा. उत्राण ता. एरंडोल) हे महसूल विभागात मंडळाधिकारी म्हणून नोकरीला आहे. त्यांच्याकडे उत्राण भाग देण्यात आले आहे. दरम्यान, बुधवार, १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अंतुर्ली शिवारातील अंतुर्ली ते तळई रोडवरील पाटाच्या चारीजवळून बेकायदेशीररीत्या वाळूचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर मंडळाधिकारी प्रमोद गायधनी यांनी पकडले. सदरील ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्याचे सांगितल्यावर शेख रफिक आणि शेख रहिम (दोन्ही रा.उत्राण, ता.एरंडोल) हे दोघे शासकीय वाहनासमोर झोपू आत्महत्या करू, असा इशारा दिला तर संजय मांगो पाटील याने ट्रॅक्टर न थांबविता पळ काढला. दरम्यान तिन्ही संशयितांनी मंडळाधिकारी प्रमोद गायधनी यांना सांगितले की, “तुम्ही ट्रॅक्टर घेवून जावू शकत नाही, तुम्ही येथून निघून जा नाहीतर तुमचे हातपाय तोडून टाकू” अशी धमकी दिली. अश्यात मंडळाधिकारी हे वाहनात बसलेले असतांना दोघांनी ओढताण करून वाहनाबाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. याप्रकरणी मंडळाधिकारी प्रमोद गायधनी यांनी कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीस ठाण्यात संजय मांगो पाटील, शेख रफिक आणि शेख रहीम (सर्व रा. उत्रण ता. एरंडोल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक निता कायटे करीत आहे.