बनावट नोटा प्रकरणी हिंगणेचा आरोपी पहूर पोलिसांच्या जाळ्यात

पहूर, ता.जामनेर : यु ट्यूबवर बनावट नोटा छापण्याचा व्हिडिओ पाहून प्रेरीत झालेल्या बेरोजगार तरुणाने घरातच बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला मात्र पहूर पोलिसांच्या गस्तीदरम्यान संशयीत अडकताच त्याच्याकडील अंग झडतीत नऊ हजार दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आढळल्यानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या हिंगणे येथील घरातून नोटा छापण्याचे कॅनन कंपनीचे प्रिंटर आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. उमेश चुडामण राजपूत (22, रा.हिंगणे बु.॥. ता.जामनेर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

सात हजारांच्या नोटा चलनात आणल्याची माहिती
पहूर पोलिस स्थानकावर कर्मचारी गस्तीवर असताना उमेश राजपूतच्या गुरुवारी संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्यास विचारपूस केल्यानंतर त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली व पोलिसांनी संशयीताची अंग झडती घेतल्यानंतर त्यात 200 रुपये दराच्या तीन नोटा बनावट आढळताच संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले व संशयीताच्या हिंगणे गावातील घराची झडती घेतल्यानंतर दोनशे रुपये दराच्या 46 नोटांसह प्रिंटर जप्त करण्यात आले. आरोपीने युट्यूबवर पाहून नोटा छापण्याचा विचार डोक्यात आल्याची कबुली देत आतापर्यंत सुमारे सात हजारापर्यंत नोटा छापल्याचे प्राथमिक माहिती दिली आहे. आरोपीविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कोठडीदरम्यान आरोपीने नेमक्या किती रुपयांच्या बनावट नोटा छापल्या शिवाय त्याचा आणखी कुणी साथीदार आहे वा नाही याची ? याची माहिती कळणार असल्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, हवालदार विनय सानप, पोलिस नाईक ज्ञानेश्वर ढाकरे, पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल गोपाल माळी आदींच्या पथकाने केली.