भीषण अपघातात वाहने पेटल्याने नऊ जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. ट्रक व डिझेल टँकर एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातानंतर वाहने पेटल्याने दोन्ही वाहनातील चालकांसह नऊ जण होरपळून ठार झाले. हा भीषण अपघात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मूलमार्गावरील अजयपूर गावाजवळ घडला. चालक अक्षय सुधाकर डोंगरे (30, बीटीएस प्लॉट, बल्लारशा), मजूर प्रशांत मनोहर नगराळे (28), कालू प्रल्हाद टिपले (35), मैपाल आनंदराव मडचापे (24), बाळकृष्ण तुकाराम तेलंग (40),साईनाथ बापूजी कोडापे (35), संदीप रवींद्र आत्राम (22, सर्व रा.दहेली) व टँकर चालक हाफिज खान (38, अमरावती), मजूर संजय पाटील (35, वर्धा) अशी मृतांची नावे आहेत.

वाहने धडकताच लागली आग
गुरुवारी रात्रीच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात असताना समोरून डिझेलने भरलेला एक टँकर येत असताना समोरा-समोर वाहने धडकताच आग लागली. लाकूड वाहतूक करणार्‍या ट्रकमधील चालकासह 6 मजूर व डिझेल असलेल्या वाहनातील तिघे मिळून एकूण 9 जणांंचा होरपळून मृत्यू झाला.

वाहतूक ठप्प : पोलिसांची धाव
या अपघातामुळे संपूर्ण रस्त्यावर आग पसरल्याने मूल व चंद्रपूर मार्गावरील वाहतूक खंडित झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच चंद्रपूर, बल्लारशा, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल येथून अग्निशमन वाहन बोलाविण्यात आले. आग आटोक्यात आली असली तरी शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत टँकर जळतच होता. सकाळीच अग्निशमन गाडीने पुन्हा आग विझवण्यात आली. त जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले.