माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा मुक्ताईनगरातील पत्रकार परीषदेत आरोप : जातीवादी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून मंजूर करून आलेल्या कामांना स्थगिती देऊन एक प्रकारे विविध समाजांच्या विकासकामांना स्थगिती दिली आहे. हा एक प्रकारचा जातीवाद असून या जातीवादी धोरणाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे स्पष्ट मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्महाऊसवर आयोजित पत्रकार परीषदेत शुक्रवारी सायंकाळी व्यक्त केले. या प्रसंगी स्वीय सहाय्यक योगेश कोलते उपस्थित होते.
हा तर आमदारांचा करंटेपणा
खडसे म्हणाले की, आमदारांनी विशेषतः माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मी 217 कोटी रुपयांची कामे मतदारसंघात मंजूर करून आणली असून त्यातील मूलभूत सुविधांसाठी दहा कोटी रुपये, मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी पाच कोटी रुपये, मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायत अंतर्गत अल्पसंख्यांक शादीखाना हॉलसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये, दलित वस्ती सुधारणे साठी दोन कोटी 20 लाख रुपये, मुक्ताईनगर ते पिंपरी अकराऊत या रस्त्यासाठी दोन कोटी 67 लक्ष रुपये, कुंड धरणासाठी दीड कोटी रुपये, बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी 100 कोटी रुपये, कुर्हा वडोदा उपसा सिंचन योजनेसाठी 50 लाख रुपये, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी 25 लक्ष रुपये, मुक्ताई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच कोटी रुपये, मुक्ताईनगर वॅाटर पार्कसाठी पाच कोटी रुपये, अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयासाठी चार कोटी रुपये तसेच मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायत अंतर्गत मागासवर्गीयांसाठी संविधान सभागृहासाठी दोन कोटी 48 लाख रुपये मंजूर केले होते. त्यामध्ये लायब्ररी वाय-फाय सुविधा यासह विविध सुविधा होत्या. अशा एकूण 217 कोटी रुपयांची कामे आपण मंजूर करून आणली. त्यात तेली समाजासाठी 50 लाख रुपये, लेवा पाटील समाजासाठी 50 लाख रुपये, बंजारा समाजासाठी मोर्झिरा येथे 15 लाख रुपये, एव्हढेच नव्हे तर मागासवर्गीयांसाठी संविधान सभागृह , मुस्लिमांसाठी शादीखाना हॉल अशा विविध समाजांचा या विकासनिधी मध्ये समावेश असताना आमदारांनी स्थगिती देण्याचा करंटेपणा केला आहे. हा एक प्रकारचा जातीवाद असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.
तुम्ही कसले शिवसेनेचे आमदार !
आमदार पाटील हे आपण शिवसेनेचे आमदार आहोत, असे प्रत्येक वेळेस जाहीर सांगत आहेत. माझे त्यांना आवाहन आहे की त्यांनी विधान मंडळांमध्ये किंवा जिल्हाधिकार्यांकडे साध्या दोन ओळीचे पत्र लिहून मी शिवसेनेचा आमदार आहे, असे सांगावे. स्पर्धा करायचा असेल तर विकासाची करा, मी 200 कोटी आणले तुम्ही 500 कोटी आणून दाखवा, स्थगिती आणण्याचा करंटेपणा करू नका. या मतदारसंघात अधिकारी यायला तयार नाही, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. मी पाच पूल करून दाखवले तुम्ही किमान शेमळदा येथे तापी नदीवरील तुम्हीच आश्वासन दिलेला एक पूल करून दाखवा, असे आव्हान माजी मंत्री खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले.
तर राष्ट्रवादीकडून उमेदवार उभा करणार नाही
मुक्ताईनगर मतदारसंघात विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील व संबंधीत मंत्री यांच्याकडे माझ्यासह अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी पाठपुरावा करीत कामे मंजुर केली होती. आमदारांनी आपण शिवसेनेचे आमदार आहेत, असे विधान मंडळात लिहुन दिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार उभा राहणार नाही, असे खुले आव्हानच खडसे यांनी यावेळी दिले.