कोल्हापूरातील लाचखोर मंडळाधिकारी व पंटर एसीबीच्या तावडीत

कोल्हापूर : लाचखोर मंडल अधिकारी संतोष सांगडे व पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड) या दोघांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वात रचण्यात आलेल्या सापळ्यात पाच हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. आरोपींनी
शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने तक्रार नोंदवली होती. शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी यांच्यासह पंटराविरोधात शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पाच हजारांची लाच भोवली
आंबा परीसरातील शेतजमिनीला वारस नोंदीसाठी तक्रारदाराने मंडलअधिकारी संतोष सांगडे यांच्याकडे अर्ज केला होता. मुबारक मुजावर (पंटर) यांच्याकरवी त्यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. गोपनिय चौकशीत लाचेची मागणी केल्याचे पुढे आले. याबाबतची पडताळणी 18 ते 19 एप्रिल 2022 दरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.20) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक (पुणे) राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलिस नाईक विकास माने, सुनील घोसाळकर, रुपेश माने, सुरज अपराध, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.