बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी लांबवले

सांगली : चोरट्यांनी चक्क बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन मोटारीतून (बोलेरो) उचलून नेले. भरवस्तीत असलेल्या या एटीएममध्ये 22 लाख 34 हजारांची रक्कम होती. शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गोळीबार करीत चोरट्यांनी ही थरार घडवून आणला.

सीसीटीव्हीवर मारला काळा स्प्रे
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोणमध्ये अर्जुन विठ्ठल निकम यांच्या इमारतीतील गाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम केंद्र आहे. मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांची मोटार एटीएमसमोर येऊन थांबली. त्यातून कानटोपी, रुमालाने तोंड झाकलेला चोरटा उतरला. त्याने आधी बाहेरच्या आणि नंतर आतील दोन्ही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर काळ्या रंगाचा स्प्रे फवारला. अलार्मच्या वायर तोडल्या. कॅमेर्‍यातून चित्रण बंद झाल्यानंतर इतर चोरटे उतरले असावेत. त्यांनी दोन्हीपैकी एक एटीएम खालच्या बाजूने कटरने तोडले आणि उचलून मोटारीत घातले.

गावठी पिस्टलातून केला गोळीबार
यादरम्यान वरच्या मजल्यावरील घरमालक निकम जागे झाले. त्यांनी वरूनच चोरट्यांच्या दिशेने घरातील काचेचे ग्लास व लाकडी बाकडे फेकले. आरडाओरडा केला; परंतु चोरट्यांनी त्यांच्या दिशेने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. या गोळीबारातून निकम बचावले. त्यांनी व त्यांच्या मुलाने भीतीने दरवाजा लावून घेतला. ती संधी साधून चोरट्यांनी मोटारीतून पलायन केले.

चोरट्यांनी बँकेचे एक मशीन उचलून नेले आहे, तर दुसरे नेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या पळवलेल्या मशीनमध्ये 22 लाख 34 हजार रुपये असल्याचे बँकेचे अधिकारी शीतल कोपार्डे यांनी पोलिसांना सांगितले.