चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर तब्बल 74 लाख रुपये किंमतीचा गुटखा कंटेनरमधून जप्त केला असून या प्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगावसह परीसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आधीदेखील कारवाईतून स्पष्ट झाले आहे तर रविवारी ओझर गावाजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाखोंचा गुटखा जप्त झाल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मध्यप्रदेशातून येणार्या एका कंटेनरमध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर ओझरजवळ पोलिस पथकाने सापळा लावला. यात या कंटेनरमध्ये 73 लाख 87 हजार रुपयांचा गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर सुमारे 20 लाखांच्या कंटेनरसह 93 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कंटेनर चालकासह दोघांना पोलिसांनी अटक करीत त्यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, सागर ढिकले, दीपक बिरारी, उपनिरीक्षक विष्णू आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, दीपक पाटील, भूषण पाटील, नीलेश पाटील, महेंद्र पाटील, अमोल पाटील, अमोल भोसले, विनोद पवन पाटील यांच्या पथकाने केली.