तरवाडे हत्याकांडातील माय-लेकींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

गावातील नागरीकांचे पोलिसांनी नोंदवले जवाब

धुळे : अल्पोपहाराचे हॉटेल चालवणार्‍या माय-लेकींचा डोक्यात धारदार शस्त्र टाकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास तरवाडे शिवारात घडली होती. या हत्याकांड प्रकरणी तरवाडे गावातील दहावर लोकांचे पोलिसांनी जवाब नोंदवले आहेत तर मृत माय-लेकींवर सोमवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या हत्याकांडाचा अद्याप उलगडा करण्यात यश आले नसलेतरी संशयाची सुई कुटुंबातील जवळच्या सदस्यांच्या भोवतीच असल्याचा पोलिस प्रशासनाला संशय आहे.

हत्याकांडाने उडाली खळबळ
चंद्रभागा भावराव महाजन (65, रा.तरवाडे, ता.धुळे) व वंदनाबाई गुणवंत महाले (45, रा.कासोदा, आडगाव ता.एरंडोल) या माय-लेकींचा सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी डोक्यात धारदार शस्त्र टाकून खून केला होता. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट कळू शकले नसलेतरी प्रॉपर्टी, कुटुंबातील वाद व अन्य चोहो बाजूने पोलिसांकडून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. गावातील दहावर नागरीकांचे पोलिसांनी जवाब नोंदवले आहेत तर खबर्‍यांचे नेटवर्कही कामाला लावण्यात आले असून त्या माध्यमातून इत्यंभूत माहिती संकलीत केली जात आहे. पोलिसांनी सोमवारी एका संशयीताला चौकशीकामी ताब्यात घेतले होते मात्र नंतर त्यास सोडून देण्यात आले तर कुटुंबियातील काही जवळच्या सदस्यांवर असलेला संशय पाहता त्यांचीदेखील पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच गुन्ह्याची उकल होईल, असा विश्‍वासही सूत्रांनी वर्तवला आहे.