वरखेड खुर्द येथे महिलांचा विनयभंग : परस्परविरोधी गुन्हे

बोदवड : तालुक्यातील वरखेडे येथे 50 व 48 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी परस्परविरोधी गटाविरोधात बोदवड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.

पहिल्या घटनेत त्रिकूटाविरोधात गुन्हा
तक्रारदाराचा मुलगा गावातील भांडण सोडवण्यासाठी गेल्याचा राग आल्याने त्रिकूटाने तालुक्यातील वरखेड खुर्द येथील 50 वर्षीय महिलेचा विनयभंग केला. ही घटना सोमवार, 23 दुपारी 2.15 च्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी सचिन आधारसिंग पाटील, सागर आधारसिंग पाटील व शिवाजी दरबारसिंग पाटील (सर्व राहणार वरखेड खुर्द) यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा गावातील भांडण सोडवण्यासाठी गेल्याने त्याचा संशयीत आरोपींना राग आला व त्यांनी सोमवारी फिर्यादी महिलेच्या राहत्या घराजवळ शिविगाळ व दमदाटी करून लोटालाट केली व महिलेचा विनयभंग केला तसेच साक्षीदार असलेला सुनील प्रभाकर चौधरी यांना शिवीगाळ व मारहाण करीत तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी दिली. तिघांविरोधात बोदवड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलिस नाईक शशीकांत महाले करीत आहे.

चौघांविरोधात गुन्हा
दुसर्‍या घटनेत 48 वर्षीय महिलेचा चौघांनी विनयभंग करीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. ही घटना सोमवार, 23 रोजी दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी सुनील प्रभाकर चौधरी, निलेश चंद्रकांत चौधरी, अविनाश अशोक पाटील, संजय गणेश राणे (सर्व रा.वरखेड खुर्द, ता.बोदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अय्युब तडवी करीत आहेत.