धुळे : तालुक्यातील तरवाडे येथील माय-लेकींच्या खुनाचा उलगडा अवघ्या तासात 36 करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हितेश गुणवंत महाले (19, रा.आडगाव, ता.एरंडोल, जि.जळगाव) या आरोपीस धुळे स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी अटक केली आहे. आई वंदनाच्या चारीत्र्यामुळे कुटुंबात वाढलेला कलह व आजी चंद्रभागाबाई या वंदना यांना माहेरी येवू देत नसल्याने संतप्त मुलानेच हा खून केल्याची बाब समोर आली आहे.
माय-लेकींच्या खुनाची अखेर उकल
धुळे तालुक्यातील तरवाडे येथील चंद्रभागाबाई भावराव माळी (65) व त्यांची मुलगी वंदना गुणवंत महाले (45) या खाटेवर झोपलेल्या असतांना त्यांचा सोमवार, 23 रोजी मध्यरात्री अज्ञाताने खून केला होता. या खुनानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. धुळे तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना खुनातील आरोपी कुटुंबातीलच असल्याचा कयास पोलिसांनी आधीच व्यक्त केला होता. मयत वंदना महाले यांच्या चारीत्र्याबाबत पती गुणवंत व मुले दिनेश व हितेश यांना संशय असल्याने त्यांच्यात सातत्याने वाद सुरू होते तर वंदना या सुमारे तीन महिन्यापासून माहेरी तरवाडे येथे आई चंद्रभागासोबत वास्तव्याला आल्या होत्या. वंदना महाले यांनी सासरी येण्यासाठी मुलांसह पतीने मध्यस्थामार्फत प्रयत्न केले होते परंतु मयत चंद्रभागा या मुलगी वंदना हिस पाठविण्यासाठी संमती देत नव्हती. या बाबीला कंटाळून मयत वंदना यांचा लहान मुलगा हितेश गुणवंत महाले (19, रा.आडगाव ता.एरंडोल जि.जळगाव) याने 23 रोजी मध्यरात्री तरवाडे येथे दुचाकी (एम.एच.18 ए.बी.8428) द्वारे येवून आधी आजी चंद्रभागा व नंतर आई वंदनाचा डोक्यात लोखंडी पाईप टाकून खून केल्याची कबुली दिली.
यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
हा गुन्हा धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय प्रकाश पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, योगेश राउत, हवालदार संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, रफीक पठाण, योगेश चव्हाण, गौतम सपकाळे, राहुल सानप, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, सुनील पाटील आदींच्या पथकाने उघडकीस आणला.