लग्नाच्या आमिषाने तरुणीवर दोघांचा अत्याचार
विद्यार्थिनींचा दोघांचा अत्याचार : संशयीत एलएलबीचा विद्यार्थी
नागपूर : आधी मित्राने लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला व नंतर त्याने फोन उचलणे बंद केल्यानंतर पीडीतेने तरुणाच्या मित्राशी संपर्क साधला मात्र त्यानेदेखील बळजबरीने पीडीतेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी सुजात असीम शर्मा (22, रा.धरमपेठ) व वृषभ गजभिये (24, रा.चंद्रपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सुजातला अटक करण्यात आली आहे.
दोघांविरोधात गुन्हा
सुजात शर्मा हा एलएलबीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. 24 वर्षीय पीडित विद्यार्थिनी ही सुजातच्या शाळेत शिकत होती. त्यांची अगोदरपासून ओळखी होती. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, जानेवारी महिन्यात सुजात अनेक दिवसांनी पुन्हा मुलीला भेटला. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर संभाषण सुरू झाले. लग्नाच्या बहाण्याने सुजातने विद्यार्थिनीवर बळजबरी केली. लग्नाचे आमिष दाखवत तो विद्यार्थिनीला हिंगणा येथील रिसॉर्टसह अनेक ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध ठेवले. गेल्या काही काळापासून सुजातने लग्नाचा विषय निघाला की टाळाटाळ सुरू केली होती. विद्यार्थिनीने दबाव टाकल्याने त्याने त्याचा मित्र वृषभ गजभिये याचा मोबाईल क्रमांक दिला व त्याच्याशी बोलण्यास सांगितले.
मित्रानेही केला अत्याचार
वृषभचा क्रमांक दिल्यानंतर सुजातने मुलीचा फोन उचलणेही बंद केले. सुजातची सत्यता जाणून घेण्यासाठी विद्यार्थिनीने वृषभ गजभिये याच्याशी संपर्क साधला. मदत करण्याच्या बहाण्याने वृषभने विद्यार्थिनीला हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. कुटुंबीयांकडून लगेच हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून सुजात शर्माला अटक करण्यात आली.