जळगाव : शिक्षक पात्रता घोटाळा (टीईटी) घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावातून बालाजी प्लेसमेंटचे संचालक अॅड.विजय दर्जी यांना अटक केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षक पात्रता परिक्षेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावात छापेमारी केली. यात टीईटी सोबतच म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावात आढळून आले असून गोलाणी मार्केटमधील बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना अटक करण्यात आली.
म्हाडा पेपर फुटीचे प्रकरणही रडारवर
अॅड.विजय दर्जी यांची बालाजी प्लेसमेंट नावाने गोलाणी मार्केटमध्ये त्यांची शाखा आहे. यात सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात. दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांच्या टीईटी घोटाळ्याची तपासणी सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. या प्रकरणात दर्जींच्या कार्यालयातील एका कर्मचार्याची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानुसार बुधवारी पथक जळगावात धडकले. पथकाने चौकशीअंती अॅड.दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेले आहे.
तांत्रिक पुराव्याच्या आधारावर कारवाई
मोबाईल कॉल डिटेल्स, ऑनलाईन व्यवहार, मेल यासह इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर अॅड.दर्जी यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न यावरून पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. दरम्यान, चाळीसगावसह पारोळा, अमळनेर व यावलमधील काही संशयीत आता पथकाच्या रडारवर असल्याची माहिती आहे.