अहिरवाडीत घर मालक झोपेत असताना लाखाचा ऐवज चोरीला

सोमवती अमावस्या चोरट्यांना पावली : श्‍वानाने दाखवला केर्‍हाळे रस्त्यापर्यंतचा माग

रावेर : सोमवती अमावस्येचा योग साधून चोरट्यांनी तालुक्यातील अहिरवाडीत धाडसी चोरी करीत सुमारे एक लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याने रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मोहगण रस्त्यावरील बाहेरपुरा भागातील रमेश शामराव महाजन यांच्या घरातून सुमारे 98 हजारांचा चोरीला गेल्याचा प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला.

चोरट्यांनी सोमवती अमावस्येचा योग साधला
सोमवती अमावस्येला चंद्रदर्शन होत नसल्याचा योग साधून चोरट्यांनी तालुक्यातील अहिरवाडी गावाकडे मोर्चा वळवला. अहिरवाडी गावातील रहिवासी रमेश शामराव महाजन यांच्या घरामागील शेताचे तारेचे कुंपण तोडून व घराच्या मागील भिंतीचे सिमेंट खिडकीचे ग्रील तोडून घरातील दोन कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह 17 हजारांची रोकड मिळून 98 हजारांचा ऐवज लांबवला. विशेष म्हणजे रमेश महाजन यांच्यासह त्यांची पत्नी, आई समोरच्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी काम फत्ते केले.

दुसर्‍या ठिकाणी आंब्याच्या रसवर चोरट्यांनी मारला ताव
अहिरवाडी गावातील रहिवासी व रमेश महाजन यांचे चुलत बंधू सुरेश फकीरा महाजन यांच्या घराचादेखील कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील पाचशे रुपयांच्या रोकडवर डल्ला मारत घरातील आंब्याचा रस व पोळ्यांवर चोरट्यांनी ताव मारला.

चोरीनंतर पोलिसांची धाव
रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ठेवल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. तालुक्यातील उटखेडा, रमजीपूरनंतर अज्ञात चोरट्यांनी अहिरवाडीत धाडसी चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरीची माहिती
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन नवले, मनोहर जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने केर्‍हाळे रस्त्यापर्यंतचा माग काढल्याने चोरटे तेथून वाहनाने पसार झाल्याचा संशय आहे.

98 हजाराचा ऐवज लंपास
रमेश महाजन यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी चार तोळे सोने, एक तोळे सोन्याचे लॉकेट, सहा हजारांची दीड गॅ्रम वजनाची सोन्याची अंगठी, दहा भार चांदी, चार भार चांदीच्या पाटल्या व 17 हजारांची रोकड मिळून 98 हजारांचा ऐवज लांबवला. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहे. अहिरवाडी गावातील रहिवासी व रमेश महाजन यांचे चुलत बंधू सुरेश फकीरा महाजन यांच्या घराचादेखील कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील पाचशे रुपयांच्या रोकडवर डल्ला मारत घरातील आंब्याचा रस व पोळ्यांवर चोरट्यांनी ताव मारला.