महावितरण कंपनीची मनमानी : अवघ्या 354 रुपयांसाठी वीज जोडणी थांबवली
सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासह विश्रामगृह अद्यापही अंधारात
सावदा : सावदा सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालय व विश्रामगृहाने 12 हजारांची थकबाकी न भरल्याने वीजपुरवठा महावितरण कंपनीने कट केला होता. याबाबत ‘जनशक्ती’ ने वृत्त प्रकाशीत करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने थकबाकी भरली मात्र आता वीज जोडणी शुल्क भरण्यासाठी 354 रुपये न भरल्याने अद्यापदेखील महावितरणने वीजपुरवठा जोडला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वीज जोडणी शुल्क 354 रुपये भरावे व ते पैसे भरल्याशिवाय वीज जोडणार नाही, अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेतल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
सरकारी नियमांचा सा.बां.विभागाला फटका
थकबाकी भरल्यानंतरही सार्वजननिक बांधकाम खात्याचा वीजपुरवठा अद्यापही सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ 354 रुपयांसाठी अडवणूक केली जात आहे. याबाबत वीज वितरणचे सावदा येथील अधिकारी यादव यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने थकबाकी भरली आहे पण नियमानुसार वीज कट केल्यावर पुन्हा ती जोडण्यासाठी जे शुल्क लागते ते भरण्यासाठी त्यांना पावती दिली असून रीतसर रक्कम भरल्यानंतर वीज जोडणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.