जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणामुळे कामाख्या एक्स्प्रेसला जेसीबी धडकला : दोघांविरोधात गुन्हा

जळगाव : जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणामुळे कामाख्या एक्स्प्रेसला जेसीबी धडकल्याची घटना शनिवार, 4 जून रोजी घडली होती. या प्रकरणी जेसीबीचा चालक मिशिर उराव सोपान उराव (28, रा.तोरार पखान टोली, तहसील सेना, जिल्हा लोहरदगा (झारखंड) व सुपरवायझर अरविंद विक्रम इंगळे (वय 28, रा. कालखेडा, ता. जामनेर) यांच्याविरोधात जळगाव रेल्वे सुरक्षा बलाने गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात रेल्वे इंजिनाचे 69 हजार रूपयांचे नुकसान झाले.

जेसीबी चालकाचा हलगर्जीपणा
शनिवारी सकाळी 10.53 वाजता परधाडे-पाचोरा रेल्वे स्थानकामध्ये किलोमीटर 379/10-8 च्याबाजूने अप मेन लाईनपासून सहा मीटर दूर रेल्वेच्या तिसर्‍या लाईनीचे काम सुरू आहे. पुणे येथील आयएससी प्रोजेक्ट बीएनए इंफ्रा ही कंपनी काम करीत आहे. यावेळी ग्रेडर मशीनने काम सुरू असतांना ग्रेडर मशीन मागे घेत असतांना उतावळेपणा आणि हलगर्जीपणाने चालकाने मशीन चालविले व जेसीबी चालकाचे संतुलन सुटल्याने ग्रेडर मशीन अप मेन लाईनीवरून जात असलेल्या गाडी (12520) कामाख्या -एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनाला (इंजीन नंबर 37460, डब्ल्यू एपी – 7) धडकले. त्यावेळी इंजिनाचे कॅटल गार्ड, सैडर्स असेंबली, फुट स्टेप्स, ब्रेक सिलेंड, ऑपरेटींग हॅन्डल तसेच ब्रेक इंडीकेटरचे नुकसान झाले. ग्रेडर मशीन लागल्याने त्याचे सुद्धा अ‍ॅक्सल तुटल्याने मागील चाक वेगळे झाले. यामुळे कामाख्या एक्सप्रेस ही गाडी 54 मिनिटे उशिराने धावली. यावेळी सिनियर सेक्शन इंजिनीयर बृजेश कुमार, व्ही.ई.सूर्यवंशी, एस.पी.जोशी, एन.एस.राजपूत, योगेश थोरात, डी.एच पाटील यांनी भेट देऊन त्यांनी संयुक्त अहवाल तयार केला.

जळगाव आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल
अधिकार्‍यांनी केलेल्या संयुक्त अहवालानुसार कोचचे 14 हजार रुपये तर इंजिनाचे 55 हजार 436 असे एकूण 69 हजार 436 रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी जळगाव येथील आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी भेट दिली. या प्रकरणी जळगाव आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक उपनिरीक्षक बी.पी.दिवेदी तपास करीत आहे.