पुणे । वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ या पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील 23 गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने दिला आहे. फुलवडे अंतर्गत भगतवाडी, माळीण अंतर्गत परसवाडी, आसाणे, जांभोरी अंतर्गत काळेवाडी, बेंडारवाडी (सर्व आंबेगाव तालुका), लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी (सर्व मावळ), मोरगिरी पदर वस्ती, भोमाळे (खेड), जांभूळवाडी (कोर्ले), पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली खालची (सर्व भोर), घुटके (मुळशी), आंबवणे, घोल (वेल्हा), निमगिरी अंतर्गत तळमाची (जुन्नर) अशी या गावांची नावे आहेत.
3 कोटी 65 लाखांचा निधी
माळीण येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील डोंगर उतारावर वसलेली घरे, वाड्या, गावांच्या प्राथमिक पाहणीत अशी 95 ठिकाणे धोकायदायक असल्याचे समोर आले होते. या ठिकाणांची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मार्फत पाहणी करण्यात आली. त्यात 23 गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या 23 गावांसाठी 3 कोटी 65 लाख 23 हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून त्यातील 16 गावांतील कामांना सुरुवात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पावसाळ्याआधी कामे उरण्याचे आव्हान
दरडीचा धोका असलेल्या 23 गावांपैकी 16 गावांमधे कामास सुरुवात करण्यात आली आहे. तर, भोर तालुक्यातील जांभूळवाडी, पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली, मुळशी तालुक्यातील घुटके आणि वेल्हे तालुक्यातील आंबवणे ही गावे वन क्षेत्रात असल्याने येथील कामे वन विभागाच्या माध्यमातून केली जातील. या गावांमध्ये सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यांनी सुचविलेल्या शिफारसीनुसार या गावांतील कामांसाठी 3 कोटी 65 लाख 23 हजार रुपयांचा निधी 7 मार्च 2018 रोजी मंजुर करण्यात आला. 16 गावांमध्ये काम सुरू करण्यात आले असले तरी ऐन पावसाळ्यात ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
तीन गावांना धोका नाही
दरडीचा धोका असलेल्या 23 गावांतील जुन्नर तालुक्यातील निमगिरी तळमाची, मावळ तालुक्यातील भुशी आणि वेल्हा तालुक्यातील धोल येथे दरड कोसळण्याचा धोका नसल्याचा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर आणि दक्षिण विभागाने दिला आहे. परिणामी येथील कामांसाठी निधी देण्यात आलेला नाही.