23 कोटींच्या ड्रेनेज वाहिनीला स्थायीची मंजुरी

0

पुणे । मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत बाणेर-बालेवाडी भागात 23 कोटींच्या ड्रेनेज वाहिनी टाकण्याच्या कामास केंद्राने परवानगी दिली आहे. या कामाचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. त्याला एक मताने मंजुरी देण्यात आली.नदी सुधार योजनेअंतर्गत सुमारे 990 कोटी रुपये खर्चुन मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी केंद्रामार्फत जपानमधील ‘जायका’ कंपनीकडून कर्ज दिले जाणार आहे. त्यानुसार, या कर्जातून 85 टक्के निधी केंद्र शासन देणार असून, 15 टक्के निधी महापालिका देणार आहे. मात्र, या योजनेस मान्यता मिळून 20 महिने लोटले तरी अद्याप केंद्राकडून यासाठी सल्लागार नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही.

6 किमीची सांडपाणी वाहिनी
सल्लागार नेमणूक होईपर्यंत या प्रकल्पांतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील सांडपाणी वाहिनीचे काम सुरू करण्याची संमती महापालिकेने केंद्राकडे मागितली होती. याअंतर्गत औंध-बाणेर भागात 60 किलोमीटरची सांडपाणी वाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यास मान्यता देण्यात आली असून मान्यतेचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे.

एनआरसीडीची मान्यता
या प्रकल्पाची समन्वयक संस्था म्हणून केंद्राने एनआरसीडीची नेमणूक केली आहे. केंद्रशासनाने घातलेल्या अटीनुसार, महापालिकेकडून राबविण्यात येणार्‍या प्रत्येक निविदा प्रक्रियेस आधी एनआरसीडीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार, मागील आठवड्यात उघडलेली निविदा एनआरसीडीकडे पाठविण्यात आली होती. त्यास मान्यता देण्यात आली आहे. या बाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.